वाद टाळा, शांतता पाळा; कुटुंबीयांचे प्रवाशांना सल्ले, सलगच्या दोन भयावह घटनांनंतर मुंबईकरांचे प्राण कंठाशी

कुणी पादचाऱ्याने रस्त्याच्या कडेच्या स्वच्छ भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्या… बसमध्ये सहप्रवासी पुढे सरकण्यास नकार देऊ लागला… रस्त्यात कुणी कचरा टाकताना दिसले… लोकलमध्ये बसण्याच्या जागेवर कुणी चप्पलेसह पाय ठेवले… प्रवासात कुणी मोठ्या आवाजात मोबाइल ऐकू लागला… सामान्यपणे राग येण्याच्या, संताप होण्याच्या या प्रसंगावेळीही आता एकच उत्तर… मौन. पूर्वी वयाने लहान असणाऱ्या प्रवाशांना दारात उभे राहू नका, बसायला जागा द्या, मोबाइल बंद करा असे सल्ले दिले-घेतले जात असत. पण आता प्रवासातही बोलायचे असले तरी बेशिस्तीकडे काणाडोळाच करण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे. घरांघरांतून पत्नी पती एकमेकांना, घरातल्या मुलांनाही आता शांततेचा, संयमाचा, दुर्लक्षाचा धडा दिला जात आहे.

मुंबईकरांमध्ये भीतीची भावना

फेब्रुवारीमध्ये लोकलप्रवासात झालेली प्राध्यापकाची हत्या आणि परवा मयंक लोहारने गमावलेला जीव… प्रवासात वाढलेल्या या हिंसेने मुंबईकर भयभीत झाले आहेत. थुंकणारे पादचारी, कचरा टाकणारी मंडळी, रांगा मोडणारे महाभाग या साऱ्या बेशिस्तांना आता सहन करायचे आणि जीव वाचवायचा तर मूग गिळून गप्प बसायचे अशी भावना झाली आहे. मुंबईकरांसाठी हा बदल धक्कादायक आणि स्वभावाला मुरड घालण्यास भाग पाडणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *