खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील छोटा गॅस सिलेंडर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. किरण जयराम बाबर (वय अंदाजे 30 ते 32) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती जयराम तोताराम बाबर हा घटनेनंतर फरार झाला आहे.
दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद, संतापाच्या भरात घरातील छोटा गॅस सिलेंडरने प्रहार
खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये राहत होते. उदरनिर्वाहासाठी ते कचरा संकलनाच्या वाहनावर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नी किरण हिच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
