दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला हा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपीला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन दिला आहे.
22 वर्षांनंतर गुन्हा दाखल; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण
सदर कथित जमिनीचा व्यवहार 2004 मधील आहे. तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर, 2026 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR Registered) केला. या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदीखत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नव्हती, ही बाब न्यायालयाने प्रकर्षाने नोंदवली.
दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. करार करताना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर आलेले नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरीत्या झाला असून, केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

