अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंब्रा बायपासवर रस्ता खचल्याची घटना घडली. या प्रकारानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या कामादरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मुंब्रा बायपासच्या दुरावस्थेमुळे मुंब्रा बायपासची प्रचंड दुरावस्था होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी या मार्गाची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर येथील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली होती. मात्र बुधवारी या मार्गावर पुन्हा एकदा रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला.
सुमनताई शाळेसमोर रस्त्याचा काही भाग खचला असून रस्त्याच्या बाहेरील भागास भेग पडली आहे. या प्रकाराची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असून तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुन्हा ‘कोंडीवार’
दरम्यान, बहुप्रतिक्षित पावसाने मंगळवारी सायंकाळी हजेरी लावताच ठाण्यातील रस्ते वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. विविध प्राधिकरणाची सुरु असलेल्या कामांचे अडथळे, चिखलमय झालेले सेवा रस्ते, घोडबंदर रस्त्यावरील अपघात आणि पावसाची रिपरिप या कारणांमुळे शहरातील वाहतूक बुधवारी कासवगतीने सुरु होती. त्याचा फटका ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला बसला. त्यामुळे ठाणेकरांना अवघ्या काही मिनिटांच्या पहिल्या पावसामध्ये ‘कोंडीवार’ अनुभवावा लागला. आता पुन्हा मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामाने वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांची दुर्दशा
ठाण्यात विविध प्राधिकरणामार्फत सुरु असलेली विकासकामे अद्याप कायम आहेत. या कामांना ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या महिन्यात मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ३१ मेपर्यंत रस्त्यांची ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे कामे पूर्ण न झाल्याने मुदत उलटूनही शहरातील सेवा रस्त्यासह विविध ठिकाणी अनेक प्राधिकरणाची कामे अद्याप सुरु आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात
नागरिकांची तारांबळ उडाली.
अपघातानंतर रोखली वाट
घोडबंदर रस्त्यावर पातलीपाडा येथून बुधवारी सकाळी एक टँकर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होता. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यामधील दुभाजकाला धडकला. त्याचवेळी एक अवजड वाहनही त्या टँकरला धडकले. या अपघातामुळे पातलीपाडा ते भाईंदरपाड्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
वाहतुकीचा वेग मंदावला
ठाणे – बेलापूर रोड मार्गावर नवी मुंबई येथील रबाळे भागात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम नवी मुंबईसह कळवा, विटावा, साकेत भागात झाला. या कोंडीने वाहतूकीचा वेग मंदावला. तसेच पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहनांचा भार वाढल्याने माजिवडा येथून कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलावरून आनंदनगर कोपरीकडे जाणारा मार्गात अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
