मुंढेंचं पुढलं टार्गेट मुंबईतील इडली-मेदूवडा? अन्न नाही विष? नमके कुठे बनतात हे पदार्थ माहितीये का?

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये  राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स व अन्न सेवा आस्थापनांसाठी ऐतिहासिक ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’ लागू करत असल्याचं सांगितलं आहे. या आदेशानुसार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील अन्न पदार्थ्यांच्या दर्जावर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. खास गोष्ट म्हणजे तुकाराम मुंढेंनी आता मुंबईतील खाद्यपदार्थ्यांच्या दर्जावर विशेष लक्ष दिलं आहे.

झोपडपट्टीत बनवतात इडली, वडे

एफडीएने मुंबईतील सर्व छोट्या-मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. नियमांची योग्य अंमलबजावणी केली जात आहे की नाही याचा प्रत्यक्ष तपास अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत एफडीएच्या रडावर मुंबईमध्ये अगदी रेल्वे स्टेशनबाहेर स्टॉल टाकून ते फुटपाथपर्यंत सगळीकडे विकल्या जाणाऱ्या इडली आणि मेदूवडे विक्रेतेही आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या या इडल्या आणि वडे धारावीसारख्या दाटीवाटीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तयार करुन शहरभर विकल्या जातात. यापैकी अनेकजण हे धारावीमधील झोपडपट्टीत असलेल्या घरांमध्ये इडली आणि मेदूवड्यासारख्या गोष्टी बनवून विकतात. यामुळेच या पदार्थांच्या दर्जाबद्दल एफडीएलाही शंका आहे.

कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जाणार?

अंबवून बनवले जाणारे हे पदार्थ शिजवताना आणि पीठ आंबवताना स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जातं की नाही? यासाठी वापरलं जाणारं पाणी शुद्ध असतं का? घरातच इडली-मेदूवडे बनवणाऱ्यांकडे एफडीएचा परवाना आहे का? या विक्रेत्यांची नोंदणी एफडीएकडे करण्यात आली आहे का? या सर्व गोष्टींचा आता एफडीएकडून शोध घेतला जाणार आहे. कणभरही भेसळ चालणार नाही या मुंढेंच्या भूमिकेनुसार एफडीएने आता या साऱ्या गोष्टी तपासून पाहून कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे.

केंद्र सील केली जाणार

नियमांचं उल्लंघन करुन असे पदार्थ तयार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास अशी केंद्र सील केली जातील. बेकायदेशीरपद्धतीने चालणाऱ्या ‘होम किचन’विरोधात एफडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अशा होम किचनने एकतर नोंदणी करावी अथवा त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी एफडीएची भूमिका आहे.

लाखोंचा दंड अन् तुरुंगवास

नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंढेंनी सोशल मिडिया पोस्टमधून दिला आहे. असुरक्षित अन्नामुळे मृत्यू झाल्यास 7 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असल्याचं मुंढेंनी सांगितलं आहे. तसेच परवान्याशिवाय अथवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. अन्नाचा दर्ज न राखणाऱ्या विक्रेत्यांना 5 लाखांचा दंड केला जाणार आहे. अस्वच्छ आणि प्रक्रियेमध्ये घोळ असल्याचं विक्रेत्यांना 1 लाखांचा दंड भरावा लागेल. तसेच एकाहून अधिक वेळा अशाप्रकारे घोळ केल्याचं दिसून आलं तर दुप्पट दंड आकारुन परवाना निलंबित केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *