नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो लाइन 8 (गोल्ड लाइन)साठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिडकोने यासाठी निविदा मागवल्या असून लवकरच मुंबईहून नवी मुंबईपर्यंत प्रवास करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच, नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास सुलभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी नव्या मेट्रो मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. ही प्रस्तावित मार्गिका 35 किलोमीटर लांब असेल आणि 20 मुख्य स्थानकं असतील. या मार्गिकेसाठी 29,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 2029पर्यंत मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट आहे.
कोणत्या परवानग्यांची आवश्यकता?
मेट्रो मार्गिका 8साठी कोस्टल रेग्युलेशन झोन, वन वन्यजीव, खारफुटी, फ्लेमिंगो अभायरण्य आणि मिठागर अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक परवानग्या घेण्यासाठी या सल्लागाराला नेमण्यात येणार आहे. 15 महिन्यांच्या कालावधीत सर्व आवश्यक मंजुऱ्या आणि आवश्यकता असल्यास उच्च न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात येतील. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या योजना तयार करण्याचं काम देखील या सल्लागाराकडे असेल. संपूर्ण मार्गावर बाधित होणाऱ्या वृक्षांची मोजणी आणि खाफुटींच्या संरक्षनासाठी योजना तयार करण्याचंही काम या सल्लागाराचं असेल.
