अनधिकृत बांधकामांवरुन नगरसेवक तापले; महापालिका आयुक्त म्हणाले, कुणालाच सोडणार नाही

शिळफाटा, खिडकाळी परिसरातील अनधिकृत गोदामांवर व्यापक तोडक कारवाई सुरु असताना ठाणे शहराच्या इतर भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय दिला जात असल्याचा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या महासभेत अधोरेखित केला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी करताच येत्या काळात शहरामधील सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले. शिळप्रमाणेच येऊर, ओवळा, खारेगाव पट्ट्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केल्याने कारवाईच्या भीतीने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

शिळ, लकी कंपाऊंड आणि आसपासच्या परिसरात अनधिकृतरित्या गोदामे उभारण्याचा सपाटा लावल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी गेल्या आठवड्यात महासभेत केला होता. ग्रीन झोन, उद्यान आरक्षण आणि शैक्षणिक आरक्षणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहत आहेत.

3 दिवसांत 217 अनधिकृत गोदामांवर कारवाई

बाबाजी पाटील यांनी कारवाईची मागणी करताच महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन) जितेंद्र निकम, उपायुक्त (परिमंडळ – १) दीपक झिजांड व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांत तब्बल २१७ अनधिकृत गोदामांवर निष्कसनाची कारवाई करण्यात आली. तर ८३० गोदामांचे सर्वेक्षण करण्यात आले.

नजीब मुल्ला यांचा गंभीर आरोप

ही कारवाई करताना विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात असून शहरातील इतर भागात अशाच पद्धतीने कारवाई का होत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. तसेच मानपाडा येथे पब, हुक्का पार्लर व फर्निचर गोदाम थाटलेल्या कोठारी कंपाउंड येथे कारवाई केली जात नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नगरसेविका मार्जिया पठाण यांनी उपस्थित केला.

आयुक्त सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

या आरोपांना उत्तर देताना आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले की, नागरिकांची सुरक्षा हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणतेही बांधकाम अथवा गोदाम नियमबाह्य असल्यास त्यावर कारवाई होणारच. कोणत्याही एका भागाला लक्ष्य करण्याचा प्रश्न नसून, शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांची माहिती संकलित करून टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

मुंबई – नाशिक महामार्गालगत खारेगाव भागात एका पेट्रोल पंपाला खेटून अनधिकृत गोदामे उभी राहत आहेत. नव्या कोस्टल रस्त्याच्या नजीक तसेच घोडबंदर रोड येथील ओवळा भागातही बेकायदा चित्रपट स्टुडिओ उभे राहत असल्याचा धक्कादायक आरोप नजीब मुल्ला यांनी केला. या बांधकामांच्या अनुषंगाने आगीच्या किंवा दुर्घटनेच्या घटना घडताना त्या कायदेशीर व बेकायदेशीर बांधकामांचा भेद करत नाहीत. त्यामुळे संभाव्य धोका असलेल्या प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला हस्तक्षेप करावाच लागणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *