मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गर्दीने लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या कारणामुळे झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये मंगळवारी रात्री २२ वर्षीय प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात मयांक लोहार प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मयांक हा चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून त्याचा एका सहप्रवाशाशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयांकच्या पोटात चाकू भोसकल्याचा आरोप आहे.
रात्री ११.०४ वाजता लोकल बोरीवली स्थानकात दाखल होताच आरोपीने पळ काढला. दरम्यान, याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रवाशाला तत्काळ स्ट्रेचरच्या सहाय्याने डब्यातून बाहेर काढून बोरीवली स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयांकला रात्री ११.४२ वाजता रुग्णवाहिकेतून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. जीआरपी आणि आरपीएफचे कर्मचारीही त्याच्यासोबत होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “लोकल बोरीवलीत पोहोचताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणा तत्परतेने कार्यरत होती.”
