शिळफाटा आणि खिडकाळी परिसरातील गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ठाणे महापालिकेच्या अलीकडील महासभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. अनधिकृत बांधकाम, बेकायदा गोदामे, अग्निसुरक्षा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आदी मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर या भागातील अनधिकृत गोदामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तीन दिवसांत तब्बल ११३ अनधिकृत गोदामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
ग्रीन झोन, उद्यान आरक्षण तसेच शैक्षणिक आरक्षणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असून महापालिकेच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गोदामांमधील रसायने नैसर्गिक जलप्रवाहात सोडली जात असल्याने परिसरातील विहिरी व कूपनलिका दूषित होत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण व निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी सुरू झालेली ही कारवाई रविवारी सुट्टीच्या दिवशी तसेच सोमवारीही अखंडपणे सुरू ठेवण्यात आली.
सर्वेक्षण मोहीम सुरूच
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोदामांना प्राधान्य देण्यात आले आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोदामांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शासकीय व आरक्षित भूखंडांवर उभारण्यात आलेल्या ८५० अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली.
