मावळातील लोहगडावर एका तरुणाचा सेल्फी घेत असताना पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. केतन अग्रवाल असं या व्यावसायिक तरुण असं नाव आहे. केतन ग्रवाल आपल्या होणाऱ्या भावी पत्नीसोबत तिचा वाढदिवस साजरा करायला लोहगडावर आला होता. सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरुन मृत्यू झाल्याच सांगण्यात आलं होतं. या घटनेनं आता वेगळं वळण घेतल आहे.
फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. केतन अग्रवाल गुरुवारी 19 जून होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेला होता.
त्या निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झालं आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरु आहे. सोबतचं प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली? या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. दहा दिवसानंतर त्यांचा जयपुर येथे विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नाच्या तयारीला घरात वेग आला होता. जयपुर ला जाण्यासाठी दोन विमानांचा बुकिंग झालं होतं, अलिशान पॅलेस आरक्षित करण्यात आला होता. कुटुंबीय नातेवाईकांनी मित्र परिवारात आनंदाचे वातावरण होतं मात्र एका क्षणात सर्व काही बदलून गेलं. गुरुवारी सकाळी किल्ल्यावर फिरताना आणि छायाचित्र काढत असताना केतनचा अचानक तोल गेला आणि पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांना धाव घेतली आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीव धोक्यात घालून अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव कार्य करण्यात आले. अखेर मोठ्या प्रयत्नांनी केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत काळाने त्याच्यावर झडप घातली होती. या घटनेनंतर गहूंजे परिसरात शोककळा पसरली आहे.
