दहा हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक डाळ जप्त

दहा हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक डाळ जप्त

जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीस चाप लावण्यासाठी मंगळवारी ८ ठिकाणी छापे टाकून १० हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहन नळदकर यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत डाळी, खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून दसरा-दिवाळीच्या तोंडावर हे भाव अधिक वाढल्याने जनतेतील वाढता रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने साठेबाजांवर धडक कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार स्वतंत्र भरारी पथकाच्या माध्यमातून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे.

त्यानुसार मंगळवारी ठाणे व रायगड जिल्ह्यात छापे टाकण्यात आले. उरण येथील पी.पी. वेअर हाऊसमध्ये छापा टाकून ७९० क्विंटल, पनवेल-अजिवली येथील आकाश वेअर हाऊस व केअरटेकर शक्ती वेअर हाऊसमधून ३ हजार १२ क्विंटल, डेरवली गावातील अक्षय कमर्शियल कॉम्प्लेक्स व बीएलआर लॉजिकमधून २२ हजार ९८६ क्विंटल, अक्षय कमर्शियलमधून २५ हजार २९४ क्विंटल तर नवी मुंबई-कळंबोली ईटीजी प्रा. वेअर हाऊसमधून २० हजार ५११ क्विंटल डाळ जप्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *