भारतात ‘बुलेट ट्रेन’साठी जपानचे अर्थसहाय्य

भारतात ‘बुलेट ट्रेन’साठी जपानचे अर्थसहाय्य

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते अहमदाबाद ही ५०५ किमी अंतराची पहिली बुलेट ट्रेन विकसित करण्याची योजना असून यासाठी सुमारे १५ अब्ज डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे. जपानने ही पहिली बुलेट ट्रेन विकसित करण्यासाठी १ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर असलेले अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या रेल्वे बांधणीचे कंत्राट मिळवण्यासाठी चीन व जपानमध्ये स्पर्धा सुरू असून यात जपानचे नाव आघाडीवर आहे. मात्र या कंत्राटासाठी अद्याप निविदा काढायच्या आहेत.

याआधी, गेल्या महिन्यामध्ये दिल्ली ते मुंबई या १२०० किमी अंतरामध्ये जलदगती ट्रेन विकसित करण्यासंदर्भातील प्रस्तावाची पडताळणी करण्यासंदर्भातील कंत्राट मिळविण्यात चीनला यश आले होते. या कामासाठी अद्यापी अर्थसहाय्याचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. अतिजलद रेल्वे बांधणीसंदर्भातील तंत्रज्ञानाचे काही प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आले आहेत. मात्र जपानचा प्रस्ताव तंत्रज्ञान व अर्थसहाय्य या दोन्ही घटकांचा समावेश असलेला एकमेव प्रस्ताव आहे, असे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष मित्तल यांनी सांगितले.

जपानी कंपन्यांकडून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेले साहित्य विकत घेतल्यास मुंबई अहमदाबाद प्रकल्पासाठी ८० टक्के अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव जपानने केंद्र सरकारपुढे मांडला आहे. भारतासहित एकंदर दक्षिण आशियामधीलच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी चीन व जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून तीव्र स्पर्धा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *