वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून डोंबिवली-ठाणे- मीरा भाईंदर- वसई आणि दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ असे दोन जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी डोंबिवली मोठागाव येथे सुरू असलेले जेट्टीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
ठाणे पुढील स्थानकातील प्रवाशांचा वाढता भार आणि त्यामानाने अपुऱ्या लोकलफेऱ्या यामुळे होणाऱ्या गर्दीतून रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. लोकलच्या दारात लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मेरीटाइम विभागाचे मंत्री असताना जलवाहतुकीचा मुद्दा मांडला होता. मुंबई ते कोकण आणि ठाणे पुढील शहरांसाठी जलवाहतूक करण्याबाबत पर्यायाची चाचपणी सुरू करत डोंबिवलीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वॉटर टॅक्सी हा प्रवासाचा सुखद आणि जलद पर्याय असून त्यावर काम सुरू असल्याचे सांगितले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील मुख्य मुद्दा असलेल्या वॉटर टॅक्सीचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली ते ठाणे गायमुखपर्यंत पहिल्या टप्प्यातील जलप्रवास लवकरच सुरू केला जाईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्र्यांकडून लवकरच पाहणी होणार आहे.
मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकल्पाचं निरिक्षण करत आहेत. डोंबिवली वरून सुरू होऊन ही ई-वॉटर टॅक्सी ठाणे, मिरा-भाईंदर आणि डोंबिवली, दिवा, ठाण्यापासून थेट नवी मुंबईपर्यंत दोन मार्गांवर धावणार आहे. काम पूर्ण होताच, आवश्यक सुरक्षा चाचाण्या करून हा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तिकीटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.
