‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय

आई, आय ॲम सॉरी, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मला माफ कर’ अशा आशयाची इंग्रजीत चिठ्ठी लिहून जेईईची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना येथे घडली.

वैदेही सुनील गुलगे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बारावीत होती. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वैदेहीची आई वंदना या शिवणकाम करतात. वैदेहीने जेईईची तयारी करण्यासाठी शिकवणी लावली. मात्र, तिला अभ्यासाचा ताण जाणवायला लागला. ती तणावात राहायला लागली. शुक्रवारी सायंकाळी वंदना या कामानिमित्त बाहेर गेल्या. यावेळी वैदेही ही अभ्यास करीत होती. आई गेल्यानंतर काही वेळाने वैदेहीने लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. रात्री तिची आई परतली असता ही घटना उघडकीस आली.

वंदना यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. एका शेजाऱ्याने वाठोडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करुन वैदहीचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी वैदेहीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मला जेईईच्या अभ्यासाचा ताण होत आहे. आई मला माफ कर’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. वैदेहीच्या आत्महत्येप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *