बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात करुण अंत, अख्खं गाव हळहळलं

कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने खंबाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण भाऊसाहेब आव्हाड (वय २७, रा. खंबाळे) असे जवानाचे नाव आहे. रविवारी (दि. १४) रात्री ९.४५ वाजता झालेल्या दुचाकी अपघातात त्यांना प्राण गमवावे लागले.

प्रवीण आव्हाड हे भारतीय लष्करात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात ते कर्तव्यावर होते. कुटुंबातील ते एकुलते एक चिरंजीव होते. अवघ्या १३ दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले होते. नवजात कन्येला पाहण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी ते ७५ दिवसांच्या दीर्घ सुट्टीवर गावी आले होते.

रविवारी (दि. १४) रात्री कामानिमित्त नांदूर शिंगोटे येथे गेलेले प्रवीण आव्हाड हे दुचाकीने खंबाळेकडे परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कन्यारत्न प्राप्तीचा आनंद अजून ओसरलाही नव्हता, तोच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने आई-वडील, पत्नी आणि कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. गावासह संपूर्ण परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …
प्रवीण आव्हाड यांच्या पार्थिवावर खंबाळे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय लष्करातील अधिकारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण यांच्या पत्नी पूजा, आई जिजाबाई, वडील भाऊसाहेब आव्हाड आणि अन्य कुटुंबीयांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्करी मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *