नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या उभारणीला वेग! ‘कनेक्टीव्हीटी’ची कामे पूर्ण; ठाणे, मुलुंड, नवी मुंबईच्या प्रवाशांना फायदा

 ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उभारल्या जात असणार् या नव्या ठाणे स्थानकाला जोडणी देणारी विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता मूळ रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे ‘ नवे ठाणे स्थानक ’ प्रवाशांच्या सेवेमध्ये लवकरच दाखल होणार असून लोकल प्रवाशांसह ठाणे, ऐरोली, मुलुंड आणि आजूबाजूच्या विविध भागांतील लाखो रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

या प्रकल्पाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास निश्चितच मदत होणार आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानजीक होणारे हे नवे स्थानक पूर्व द्रुतगती महामार्ग आणि एलबीएस मार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ठाण्यासह मुलुंड आणि ऐरोली खाडी पुलाच्या परिसरानजीक राहणाऱ्या रहिवाशांना या स्थानकामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या विविध मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात रॅम्प, उड्डाणपूल, सॅटिसचा काही भाग अशा कामांचा समावेश आहे. सध्याच्या ठाणे रेल्वे स्थानकावर उपनगरीय रेल्वेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रचंड भार आहे. हा भार नव्या स्थानकामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

पाठपुराव्याला यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही, स्थानकाच्या कामाला गती मिळवून दिल्याबद्दल ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी ९४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाने सादर केला आहे. मात्र तो रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा, अशी मागणी म्हस्के यांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलेल, असा सकारात्मक निर्णय घेत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. त्याबाबतचा पत्रव्यवहारही रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी केला आहे. त्यामुळे नवीन स्थानक उभारणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, असेही म्हस्के यांनी सांगितले.

.यामुळे रखडले काम

सन ‘स्मार्ट सिटी अभियान’ २०२५मध्ये बंद झाल्यामुळे अतिरिक्त अनुदान बंद होणे, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या अडचणी, करोना काळात विलंब व त्यामुळे वाढता आर्थिक बोजा पाहता स्थानकाचे काही काळापासून काम संथ गतीने सुरू होते.

नावाबाबत वेधले लक्ष

सध्या या ठिकाणी स्थानकाच्या केबलिंगचे काम सुरू आहे. त्यासोबत रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर आहे. ठाण्याच्या विकासात आनंद दिघे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे या स्थानकाला ‘धर्मवीर आनंद दिघे स्थानक’ हेच नाव भविष्यात दिले जाईल, असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *