दोन दशकांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. शनिवार २० जूनला सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यादिवशी अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. तब्बल २० वर्ष तेरा दिवसाच्या कालावधीत चाललेल्या सुनावण्यांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय या बहुचर्चित प्रकरणावर अंतिम निर्णय देणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागलं होतं. मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील निकालासाठी रुग्णवाहिकेतून कोर्टात आले होते. पाटील कुटुंब आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कुटुंब यासाठी कोर्टात आले होते.
वीस वर्षांपूर्वीचे हत्याकांड
३ जून २००६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
राजकीय वैमनस्यातून कटाचा आरोप
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या सर्व आरोपी जामिनावर मुक्त आहेत. धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षातून आणि वाढत्या राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा उल्लेख सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पवनराजे निंबाळकर यांचा वाढता प्रभाव आणि राजकीय अस्तित्वामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या खुनासाठी २५ ते ३५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.
पारसमल जैन झाला माफीचा साक्षीदार
पवनराजे निंबाळकर खटल्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणून पारसमल जैन याचे नाव पुढे आले होते. तपास यंत्रणांच्या मते, जैननेच सुपारी स्वीकारुन संपूर्ण कटाची अंमलबजावणी केली होती. जमिनीच्या व्यवहाराच्या बहाण्याने पवनराजे निंबाळकर यांना कळंबोलीला बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर गोळीबार केला. पुढे न्यायालयाने जैनला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली. त्यामुळे त्याची साक्ष सीबीआयच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे.
या खटल्याची सुनावणी विशेष सीबीआय कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल १२८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अनेक वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. गृहमंत्री, सिंचन मंत्री आणि ऊर्जा मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यासाठी हा निकाल प्रतिष्ठेचा विषय मानला जातो.
