ठाण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, जिल्हा बँक निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच फूट

ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ (टीडीसीसी) निवडणुकीत अखेर केंद्रात आणि राज्यातील सत्तेत एकत्रित असलेल्या महायुतीतच फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’ विरुद्ध भाजपमधील नेतेमंडळी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ‘सहकार पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक शत्रू असलेल्या नेत्यांनी सहकार क्षेत्रात एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहे. त्यामुळे आता महायुतीतच थेट सामना रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाण्यातील भाजप ठाणे जिल्हा विभागीय कार्यालयातील पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हा बँक निवडणुका महायुती एकत्रित लढेल, असे सुतोवाच केले. महायुतीचे पुरस्कृत ‘परिवर्तन पॅनल’ रिंगणात उतरले असून काही मतभेद असतील ते देखील दूर करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला होता.

मात्र एकीकडे ही घोषणा होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे आणि अरुण पाटील, माजी संचालक ज्ञानेश्वर डुंबरे, रंभाजी जगताप, संदीप कालेकर यांनी भेट घेतली. या बैठकीत सहकार पॅनलच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच सहकार पॅनलच्या काही सदस्यांनी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचीही भेट घेतली. या दोन्ही भेटीत निवडणुकीतील रणनीती, मतदारांशी संपर्क तसेच उमेदवारांच्या निवडीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते महायुतीच्या परिवर्तन पॅनलची घोषणा करत असताना महायुतीतच बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहकार पॅनलची घोषणा

निवडणुकीतील सहकार पॅनलची आज, सोमवार, १५ जून रोजी घोषणा झाली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ‘सहकार पॅनल’ रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर सहकार पॅनलचे आव्हान दिल्याची ठाण्यातील पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. पॅनलच्या घोषणेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) खासदार सुरेश म्हात्रे, भाजपचे आमदार किसन कथोरे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आणि ‘बविआ’चे नेते हितेंद्र ठाकूर उपस्थित होते.

पारंपरिक राजकीय शत्रू आमनेसामने

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेली असताना त्यांच्याकडे महायुतीच्या परिवर्तन पॅनल प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शह दिलेले ‘राष्ट्रवादी’चे सुरेश म्हात्रे हे पाटील यांच्या विरोधातील महायुतीच्याच सहकार पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. यासोबतच पाटील यांच्यासोबत असलेला भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत असल्याने कथोरे समर्थकांनी परिवर्तन पॅनलमध्ये डावलल्याचे आरोप करत सहकार पॅनलचा पर्याय उभा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *