एअर इंडियाच्या विमान अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या बदलापूरच्या पाठक कुटुंबाचे दुःख वर्षभरानंतरही कायम आहे. अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले तरी दीपक पाठक यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांचे आईवडील अद्याप सावरलेले नाहीत. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींशी झुंज देत असलेल्या या कुटुंबाची वेदना आजही तितकीच तीव्र आहे.
आधी मुलीचे निधन, मग मुलाचे
एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक अहमदाबाद-लंडन विमान अपघातात मृत्युमुखी पडले होते. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला दीपक गेल्यानंतर पाठक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वर्षांपूर्वी कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे निधन झाल्याने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दीपकच्या मृत्यूने ते पूर्णपणे कोलमडले.
