दादर, सीएसएमटीनंतर आणखी एक टर्मिनस मुंबईकरांसाठी लवकरच सुरू होणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर अखेर मुंबईतील जोगेश्वरी टर्मिनसचं काम प्रगतीपथावर सुरू आहे आणि जानेवारी 2027पर्यंत प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. या मुळे पश्चिम रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आणखी एक रेल्वे स्थानक उपलब्ध होणार आहे.
कसं असेल टर्मिनस?
यापूर्वी जोगेश्वरी टर्मिनस मार्च 2025मध्ये सुरू होणार होतं. पण त्यानंतर टर्मिनसच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळे प्रकल्पाची डेडलाइन 1 वर्ष पुढे ढकलली. जुन्या डिझाइनमध्ये टर्मिनसवर तीन फलाट बांधण्यात येणार होते. त्यानंतर तीनऐवजी चार फलाट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. चौथं फलाट होम प्लॅटफॉर्म म्हणून बनवण्यात येत आहे. त्याशिवाय जुनया फलाटांची लांबीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेनची संख्या वाढल्यावर वाढलेली प्रवासी संख्या हाताळणं शक्य होईल. तसेच, सर्व फलाटांची रुंदीही 9 मीटरवरून 12 मीटर करण्यात आली आहे.
जोगेश्वरी टर्मिनस एका दिवसांत 24 डब्यांच्या 12 मेल/एक्सप्रेस हाताळू शकणार आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनसाठी एक कोचिंग डेपोही बांधण्यात येणार आहे. अनेक प्रवासी संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून कामांचा वेग वाढवण्याची मागणी करत आहेत. बोरिवली आणि अंधेरीसारख्या रेल्वे स्थानकांवर वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोगेश्वरी टर्मिनस लवकरात-लवकर सुरू करणं आवश्यक आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर आणखी एका टर्मिनसचीही गरज आहे.
जुन्या टर्मिनसवरील ताण कमी होणार
सध्या वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रवासी संख्या आणि गर्दी वाढत चालली आहे. लोकल आणि एक्सप्रेस प्रवासी एकाच वेळी स्थानकांवर दाखल झाले की अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होते. जोगेश्वरी टर्मिनसमुळे मोठा फायदा होणार आहे. राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ आणि जोगेश्वरी मेट्रो स्थानकापासून अगदी 250 मीटर लांब टर्मिनस उभारण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो या दोन्ही मार्गाने प्रवासी टर्मिनसवर पोहोचू शकतात. तसेच, स्थानक परिसरात कॅब, ऑटो स्टँडसह पार्किंगची व्यवस्थाही उपलब्ध असेल.
मुंबईत 34 वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वतंत्र रेल्वे टर्मिनस उभारण्यात आलं होतं. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसनंतर जोगेश्वरी टर्मिनस उभारलं आहे. दादर आणि पनवेल सारख्या स्थानकांना गेल्या काही वर्षांत अपग्रेड करून टर्मिनसमध्ये बदलण्यात आलं. सध्या या प्रकल्पाचं 55 टक्के काम पूर्ण झालं असून येत्या सहा महिन्यांमध्ये नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
