दादर पच्छिम येथील डी एस बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने मनसे आक्रमक झाली आहे. गोखले रोडच्या लगत असलेल्या मार्गावर पांढरी पट्टी मारलेली दिसली. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला. बाबरेकर मार्गावर असलेल्या जैन मदिराच्या बाजूच्या लेन मध्ये हा पट्टा मारण्यात आला आहे. लेन च्या सुरुवातीपासून ते गोकुळ धामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारण्यात आलाय. याप्रकरणी स्थानिक संतप्त झालेले पाहायला मिळाले.
पांढऱ्या पट्ट्यावरील वाद नेमका काय?
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागांतील रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून सामाजिक माध्यमांवर तसेच राजकीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. जैन धर्मीयांच्या धार्मिक परंपरेनुसार पर्युषण काळात साधू-साध्वींच्या पदयात्रेदरम्यान त्यांच्या मार्गावर सूक्ष्म जीवांचा मृत्यू होऊ नये, यासाठी काही ठिकाणी रस्त्यांवर पांढरे पट्टे किंवा चुन्याच्या रेषा काढल्या जातात.मुंबईतील काही रस्त्यांवर सार्वजनिक जागेत असे पट्टे काढल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक रस्त्यांचा धार्मिक कारणांसाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला.
स्थानिक संतप्त
दादरमध्ये शिवतीर्थच्या अंगणात पांढरी पट्टी मारलेली दिसली.संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात पांढरी पट्टी आखली गेली होती. जैन धर्मगुरुंना चालवण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा दावा करण्यात आलाय. पांढरी पट्टी आमच्या धार्मिक भावनेशी निगडित असल्याचं जैन धर्मियाचं मत आहे. याआधीही पांढ-या पट्टीवरुन घाटकोपरमध्ये वाद झाला होता. मागच्या सहा-सात वर्षापासून भयानक प्रकार सुरु आहे. सकाळी 5.30 वाजता सांडपाणी टाकलं जातं. इथे शाळा आहे, ज्याला त्यांनी धार्मिक स्थळ बनवलंय. तसेच अनधिकृत गाड्यांची पार्कींग करुन रस्ता अडवला जातो. यामुळे रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला जातो, असा आरोप स्थानिकांनी केलाय.
मनसैनिकांनी आक्षेप घेतल्यानंतर जैन धर्मियांनी रस्त्यावर काढलेली पांढरी पट्टी हटवण्यात आलीय. पांढरी पट्टी हटवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर विशिष्ट द्रव पदार्थ मारला जातोय. हा वाद महाराष्ट्रभर पसरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पांढऱ्या पट्ट्या आता मुंबईभर पसरायला लागल्या आहेत. तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवला. साधा मंडप टाकायचा असेल तरी बीएमसीची परवानगी घेण्यात येते, मग तुम्हाला पांढरी पट्टी मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा संतप्त सवाल मनसैनिकांनी केलाय.
जैन समाजाची भूमिका काय?
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी हे पट्टे कोणताही अडथळा निर्माण करण्यासाठी नसून धार्मिक परंपरेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच यामुळे वाहतुकीवर परिणाम होत नसल्याचा दावा करण्यात आला.प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित भागांची माहिती घेतली. नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर दोन मतप्रवाह
काहींनी धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करण्याची भूमिका घेतली, तर काहींनी सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारचे चिन्हांकन करण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे हा मुद्दा धार्मिक भावना आणि सार्वजनिक नियम यांच्यातील संतुलनाचा विषय ठरला आहे.एकूणच, जैन धर्मीयांच्या धार्मिक परंपरेतून काढलेल्या या पांढऱ्या पट्ट्यांमुळे मुंबईत धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जागांच्या वापराबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.
