कोकण रेल्वेवर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर; संकट येण्याआधीच मिळणार अलर्ट

मान्सून काळात कोकण रेल्वे मार्गावरील दरडी, दगड कोसळणे आणि रुळांवरील अडथळ्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र यंदा अशा धोक्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोकण रेल्वेने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संभाव्य धोका आधीच ओळखून तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वेने दासगाव स्थानकाजवळील बोगद्याबाहेर अत्याधुनिक रेल्वे ट्रॅक निरीक्षण आणि इशारा प्रणाली बसवली आहे. ही प्रणाली सी-डॅकने विकसित केली असून रुळांवरील कोणताही अडथळा ओळखून नियंत्रण कक्षाला तत्काळ सूचना पाठवण्याची क्षमता तिच्यात आहे. सध्या या यंत्रणेची चाचणी सुरू असून ती यशस्वी ठरल्यास कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या बोगद्यांजवळही अशी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

मान्सूनपूर्व तयारीची माहिती देताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी रेल्वे प्रशासनाने यंदा पारंपरिक उपाययोजनांसोबत आधुनिक तंत्रज्ञानालाही प्राधान्य दिल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांत मान्सूनमुळे दीर्घकाळ रेल्वे वाहतूक ठप्प होण्याच्या घटना टाळण्यात यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

काय आहे या यंत्रणेची खासियत?

नवीन प्रणाली रुळांवर पडलेले दगड, दरड, झाडे किंवा माती घसरण्याच्या घटना ओळखू शकते. इतकेच नव्हे तर रुळांवर आलेली जनावरे किंवा वन्यप्राणीही या यंत्रणेच्या नजरेतून सुटणार नाहीत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसताच नियंत्रण कक्षाला त्वरित सूचना मिळणार आहे.

मान्सूनसाठी विशेष तयारी

यंदा १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी गस्तीसाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डोंगरउतारांवरील संरक्षणात्मक कामे, रॉक बोल्टिंग, शॉटक्रीटिंग, गॅबियन भिंती आणि जाळ्यांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे.

याशिवाय पूर इशारा प्रणाली, स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, अपघात निवारण रेल्वे आणि चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *