पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई करत दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक केली आहे. सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्कुलरच्या मदतीने त्याला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणाच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जून 2024 मध्ये या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार गणेश काळे हा दुबईतून नेटवर्क चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.
कोट्यवधी रुपयांची रक्कम विविध ठिकाणी वळवली
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी भारतातील नागरिकांना मोठ्या कमाईचं आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच इंटरनेट बँकिंगची माहिती मिळवत होता. या खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीतील कोट्यवधी रुपयांची रक्कम विविध ठिकाणी वळवली जात होती.
दुबईमध्ये स्वतःचं कार्यालय
सायबर पोलिसांच्या तपासात गणेश काळे याने दुबईमध्ये स्वतःचं कार्यालय उभारल्याचंही उघड झालं आहे. त्याचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचं तांत्रिक तपासातून समोर आलं आहे. टास्क फ्रॉड, बनावट शेअर मार्केट गुंतवणूक योजना आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांद्वारे त्याने नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
