ट्रेनला 5 तास विलंब, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?

कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता संपल्यामुळे त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ट्रेन विलंबाने धावत असल्यामुळे हा व्यक्ती स्थानकावर अधिक काळ थांबला होता. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

नेमकं काय घडलं?

11 जून रोजी कल्याण जंक्शनवर एक व्यक्ती आपल्या नातेवाईकांना लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आला होता. ही ट्रेन दुपारी 12 वाजता कल्याण स्थानकावर दाखल होणार होती. पण काही कारणांमुळे ट्रेनला 5 तास उशीर झाला. त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवाशांची रखडपट्टी झाली. नातेवाईकांना सोडण्यासाठी या व्यक्तीने प्लॅटफॉर्म तिकीट काढलं होतं. पण हे तिकीट केवळ 2 तासांसाठी वैध असतं. त्यामुळे टीसीने या व्यक्तीला 500 रुपयांचा दंड ठोठावला.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटाचा गाडीच्या आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळीशी काहीही संबंध नसतो. हे केवळ एका ठराविक कालावधीसाठीच वैध असतं. रेल्वे कर्मचाऱ्याने या नियमाचं पालन करून त्याच्याकडून दंड आकारला. पण ट्रेनला विलंब झाला यामध्ये प्रवाशांची किंवा नागरिकांची काय चुक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ट्रेनचं वेळापत्रक हे प्रवाशांच्या नियंत्रणाबाहेर असतं. त्यामुळे अशा वेळी दंड आकारणे म्हणजे प्रवाशांवर अन्यायच आहे त्या नागरिकाची प्रतिक्रिया होती.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर स्थानकावरच व्हिडिओ करून या व्यक्तीने तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष वेधलं गेलं. या प्रवाशाची क्लिप तुफान व्हायरल झाली असून हजारो नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. काही प्रवाशांनी कमेंटमध्ये त्यांनाही काही स्थानकांवर असाच अनुभव आला असल्याचं सांगितलं. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळेच आधीच प्रवासात विलंब होतो. आता त्यांच्याकडून अतिरिक्त पैसेही उकळले जात आहेत असा आरोप केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *