महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांचा वाढता विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळणार नसून वीज वितरण व्यवस्थापनासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत विद्यमान मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे संदेश ग्राहकांना प्राप्त झाल्यानंतर नाराजी अधिक तीव्र झाली आहे.
स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांचं आंदोलन
नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यापूर्वी अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना स्मार्ट मीटर लावण्याऐवजी खंडित वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे. टिटवाळा परिसरात वारंवार होणाऱ्या वीजखंडितीच्या विरोधात तसेच स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्मार्ट मीटर योजनेला विरोध कायम ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
मागील काही दिवसांपासून महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात वाढ झाल्याचा दावा काही ग्राहकांनी केला असून यासंदर्भात त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारींचे समाधानकारक निराकरण होत नसल्याची भावना काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
नेमके फायदे काय आहेत?
स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात आहे का, तसेच त्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याशिवाय ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेचा वापर आणि त्याबाबतचा तपशीलही सार्वजनिक करावा, अशी अपेक्षा काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न आणि शंका उपस्थित होत असताना महावितरणने याबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
४८ तासांत मीटर बदलण्याच्या संदेशांमुळे चर्चा
वीजबिल वाढल्याचा काही ग्राहकांचा दावा
अखंड वीजपुरवठ्याची नागरिकांची मागणी
टिटवाळ्यात शेकडो नागरिकांचे आंदोलन
महावितरणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
स्मार्ट मीटरचे फायदे
वीजबिल प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप दूर होऊन ग्राहकांचा वेळ वाचणार.
मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना विजेच्या वापराचे व्यवस्थापन करता येणार.
स्मार्ट मीटर लावलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराबद्दल प्रतियुनिट ८० पैशांची सवलत मिळेल.
वीजसेवा, बिलांसंदर्भातील शंकांचे तातडीने निराकारण होणार.
वीजचोरी, मीटरमधील फेरफाराला आळा बसणार.
