सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणारे भाविकांचे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर सात जणांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. एक लहान मूल पाण्यात बुडताना पाहून बाजूने जाणारा दुचाकीस्वार इरफान मुजावर याने तात्काळ पाण्यात उडी घेतली. बालकाला छातीशी कवटाळून धरत त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला.
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील १५ भाविक पिकअप वाहनाने सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याशेजारील शेतातील मोठा व्यास असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत पिकअप वाहन कोसळले.
लहान बाळ बुडताना दिसलं
तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरुन गाडीच्या मागूनच येत होता. पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून त्याने तातडीने ग्रामस्थांना मदतीसाठी फोन केले. इतक्यात, एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचे त्याला दिसले. त्याने क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. चिमुरड्याला छातीशी कवटाळत त्याच्या पोटात गेलेले पाणी इरफानने बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
पाच जणांचे जीव वाचवले
पाण्यात हालचाल जाणवल्यावर इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांनाही बाहेर काढले, तर दोघे पुरुष पोहून बाहेर आले. परंतु पिकअप वाहन विहिरीत उलट्या बाजूने पडल्याने आतमध्ये असणाऱ्या सात महिला आणि एक सहा महिन्याच्या बाळाला प्राण गमवावे लागले, याबाबत इरफानने खंत व्यक्त केली.
मृतांमध्ये इंदुबाई दशरथ बावचे (६०), पूजा अमोल सातोरे (२३), पूजा बालाजी बावचे (२७), अश्विनी संदीप बावचे (२७), संस्कार संदीप बावचे (१४), संस्कृती संदीप बावचे (१४), आरव अमोल सातोरे (८) आणि समर्थ बालाजी बावचे (६ महिने) यांचा समावेश आहे.
विहिरीतून जिवंत बाहेर काढलेल्या सर्वांना तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची कसून चौकशी केली जाणार असून ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिला.
