कोकणवासियांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार! 263 किमी लांब मार्गाचं दुपदरीकरण होणार; प्रस्ताव केंद्राकडे सादर

कोकण रेल्वेच्या विस्ताराची कोकणवासी गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत आहेत. आता कोकणवासियांचं स्वप्न सत्यात उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणावर काम सुरू होणार आहे. तब्बल 263 किलोमीटर लांब मार्गावर दुपदरीकरण, तीन नवीन रेल्वे स्थानक आणि अतिरिक्त लूप मार्गांचा विकास करण्याची योजना आहे. यामुळे कोकण रेल्वेचा महाविस्तार होणार आहे.

नेमका प्रकल्प काय?

कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी पाच वर्षीय प्लॅन तयार केला गेला आहे. यासाठी एकूण 470.08 कोटींचा खर्च अपेक्षित असून रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवला आहे अशी महिती कोकण रेल्वेचे संचालक आणि व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी ‘मिड-डे’सोबत बोलताना दिली. रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ठोकूरदरम्यान 740 किमी लांब मार्गावरील कोंडी फोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

ठोकूर ते मुकंबिका रोड-ब्यनदूर या मार्गावर 112 किमी तर वैभववाडी ते माजोर्डा या मार्गावर 151 किमी असं एकत्र 263 किलोमीटर मार्गावर दुपदरीकरण करण्यात येणार आहे. रोहा-मडगाव पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 143 टक्के तर मडगाव ते ठोकूर पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 128 टक्के अधिक प्रवासी प्रवास करतात असं एका नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समोर आलं होतं. त्यामुळे या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची योजना तयार केली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला असून जून 30पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ 54.66 किमी मार्गां दुपदरीकरण करण्यात आलं आहे.

तीन नवीन स्थानकं कुठे?

मायेम, मुकंबिाका रोड-ब्यनदूर आणि न्यूरा-ओ-ग्रान्डे या ठिकाणी तीन नवी क्रॉसिंग स्थानकं बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासह गोकर्णा मार्ग, होन्नावर,बरकूर, उडुपी, अंकोला या ठिकाणी लूप मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 696.77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी आणि कोंडी कमी करण्यात यश येण्याची शक्यता आहे.

याशिवाय मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे डबे वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. या ट्रेनसाठी मोटी डिमांड आहे अशी माहिती झा यांनी ‘मिड डे’ ला दिली. वंदे भारत ट्रेनसध्या आठ डब्यांची आहे. मुंबई लोकलहूनही कमी डबे असलेल्या या ट्रेनमधून प्रवासी मोठ्या संख्येने प्रावस करतात. त्यामुळे या मार्गावर एक्सप्रेसची क्षमता वाढवण्याची गरज आहे.याशिवाय या मार्गावर 11 लेवल-क्रॉसिंग गेट, 48 स्थानकांवर विद्युत इंटरलॉकिंग प्रणाली आणि कवच प्रणालीही विकसित केली जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *