विदर्भ, नाशिक, मुंबई या आणि अशा अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून एकाच नावाची चर्चा आणि काहींमध्ये या नावाची दहशतसुद्धा पाहायला मिळत आहे. हे नाव म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्यपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं. भेसळयुक्त अन्न, औषधं, गुटखा तस्करी आणि तत्सम अवैध व्यवसायांना आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुंढेंनी त्यांच्या कार्यशैलीला सुरुवात केली. कोट्यवधींचा भेसळयुक्त कच्चा माल असो किंवा चुकीची कामं करणाऱ्यांचे तळ असो, यंत्रणा हाताशी घेत तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाकाच लावला. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सात दिवसांमध्ये त्यांनी अशी काही कामगिरी केली, की राजकारण्यांवर चर्चा करणारी सामान्य मंडळी या अधिकाऱ्याच्या कामानं प्रचंड प्रभावित झाली. परिणामी सध्याचा चर्चेचा विषय, तुकाराम मुंढे!
बेधडकपणे कारवाई करणाऱ्या त्यांच्या या शैलीला पाहता सामान्य नागरिकांचा सहभाग असणाऱ्या संघटनांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला आहे. विदर्भातील ग्राहक पंचायतीकडून या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करत त्यांना आवश्यक संरक्षण, कार्यपद्धतीत स्वातंत्र्य आणि प्रशासकीय पाठबळ देऊ करावं अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सात दिवसांत 33 धाडी, 34 आस्थापना सील आणि 35 गुन्ह्यांची नोंद अशी आकडेवारीच मुंढे यांच्या कामाच्या पद्धतींचा वेग सांगत आहे. अशा स्थितीत त्यांना सामान्यांसह आता प्रशासनानंही साथ द्यावी अशी मागणी उचलून धरली जात आहे
