अनुकूल वातावरणामुळे मान्सूनने मंगळवारीदेखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत आगेकूच केली असून दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरच्या पुढे आणि लगतच्या भागात तो पोहोचल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण असेल, असे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आले आहेत. असं असलं ती पुण्यामध्ये मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांची वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात जूनच्या पहिल्या दहा दिवसांत सरासरी ४९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात मान्सूनपूर्व पावसाचा वाटा मोठा असतो. या वर्षी शहरात दहा दिवसांत पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे ‘आयएमडी’च्या नोंदवहीत पुण्यासमोर अद्याप शून्याचीच नोंद आहे. याउलट गेल्या वर्षी शहरात संपूर्ण मे महिना पाऊस पडला होता. जून महिन्याचा सरासरी पाऊस एक महिना आधीच बरसला होता. जूनमध्येही पावसाने समाधानकारक हजेरी लावली. या वर्षी मे महिन्यातही मोजकेच काही दिवस वळवाचा पाऊस पडला. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने पुणेकरांना निराश केले आहे.
कोकणातील बहुतांश भागात सध्या मान्सून बरसतो आहे, तर राज्याच्या इतर भागांत ढगांच्या गडगडाटासह वळवाचा पाऊस दररोज हजेरी लावतो आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली; पण जूनचा आठवडा उलटला तरी पुणे शहरात पाऊस पडलेला नाही. शहरात दोन दिवसांपासून दुपारनंतर वारे वाहत आहेत, त्यामुळे पुणेकरांना उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी आकाश ढगाळ आणि वाऱ्यांमुळे रस्त्यावर फिरताना सुसह्य वातावरण जाणवते आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात घट झालेली नाही. या काळातील सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदविण्यात येते आहे.
पुण्यात कधी बरसणार पाऊस?
दरम्यान, “पुढील दोन दिवसांत शहर वातावरणात बदल होतील. तापमानात थोडी घट होऊन, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. गुरुवारनंतर शहरात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे,” असं ‘आयएमडी’तील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी म्हटलं आहे.
