ठाण्यात धक्कादायक घटना! रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी हटकल्याच्या रागातून परप्रांतीय रिक्षाचालकाची वयोवृद्धाला मारहाण

ठाण्यात एका परप्रांतीय ओला रिक्षाचालकाकडून वयोवृद्धाला मारहाण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सदर प्रकरणामुळे ठाणे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर परप्रांतीय ओला रिक्षाचालक हा रस्त्यावर पाण्याच्या गुळण्याकरून थुंकत होता. यावेळी रस्त्यावरून चालणाऱ्या एका वयोवृद्ध जोडप्यातील व्यक्तीने त्याला हटकले. सार्वजनिक ठिकाणी असं थुंकू नये आणि अस्वच्छता पसरवू नये अशी समज दिली. मात्र यागोष्टीचा परप्रांतीय रिक्षाचालकाला राग आला आणि त्याने वयोवृद्ध व्यक्तीसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की ओला रिक्षाचालकाने थेट वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली. रिक्षाचालकाने वयोवृद्ध व्यक्तीच्या दिशेने मोठा दगड फेकला ज्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली.

सदर गोष्टीची माहिती जेव्हा दोन्ही शिवसेनेच्या युवासैनिकांना समजली तेव्हा त्यांनी संबंधीत ओला चालकाला शोधून काढण्यासाठी तातडीने हालचाली सुरु केल्या. अवघ्या काही तासात ओला चालकाचा शोध घेण्यात युवासैनिकांना यश आलं. यावेळी त्यांनी ओला चालकाला पकडून त्याला शिवसेना स्टाईल चोप दिला.

पोलीस करणार कारवाई : 

ओला चालकाला युवासैनिकांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं आता पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. व्हायरल व्हिडीओ आणि घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता वर्तकनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याआधीही घडल्यात अशा घटना : 

घटना क्रमांक 1 : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील जांभळीनाका भाजी मंडईत एका स्थानिक मराठी महिला भाजी विक्रेत्या आणि परप्रांतीय विक्रेता यांच्यामध्ये वाद झाला. या घटनेनंतर स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता.

घटना क्रमांक 2 : ठाणे स्थानक परिसरातील एका मोबाईल दुकानात परप्रांतीय तरुणाने एका मराठी तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. ज्यामुळे बराच काळ ठाणे स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घटना क्रमांक 3 :  कल्याणमध्ये एका दवाखान्यात रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीवर एका परप्रांतीय व्यक्तीने हल्ला केला होता. त्यानंतर हल्ल्याप्रकरणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर परप्रांतीय व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *