बीकेसी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 जूनपासून प्रत्येक शुक्रवार ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ म्हणून पाळला जाणार असून जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांना ट्रेन, मेट्रो आणि बसचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. बीकेसीसारख्या मोठ्या व्यावसायिक केंद्रामधील असा उपक्रम हा देशातील पहिलाच असा उपक्रम ठरला आहे.
शुक्रवारच का निवडला?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बीकेसीमधील सुमारे 90 कंपन्या आणि संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत बेस्ट, मुंबई मेट्रो, वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांचाही सहभाग असेल. आठवड्याच्या शेवटी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण तुलनेने कमी असतो, त्यामुळे ते पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करण्यास अधिक तयार असतात. याच कारणामुळे शुक्रवारची निवड करण्यात आली आहे.
तीन ते चार महिने होणार चाचणी
या उपक्रमावर किमान तीन ते चार महिने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. दर आठवड्याला येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 82 टक्के प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक अधिक विश्वासार्ह आणि सोयीस्कर झाल्यास ती वापरण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रवाशांच्या मुख्य तक्रारी काय?
बीकेसीमध्ये येणाऱ्या प्रवाशांची सर्वात मोठी अडचण म्हणजे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यावर कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर रिक्षा किंवा बस सहज उपलब्ध नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. याशिवाय पादचारी सुविधांचा अभाव, चालण्यासाठी सावली नसणे आणि बेस्ट बसच्या फेऱ्यांची कमतरता हीही प्रमुख समस्या असल्याचे समोर आले आहे.
52 टक्के प्रवासी अजूनही खासगी वाहनांवर अवलंबून
एमएमआरडीएच्या माहितीनुसार, बीकेसीमध्ये येणाऱ्या 52 टक्के लोकांचा प्रवास अजूनही खासगी कार, टॅक्सी किंवा रिक्षांवर अवलंबून आहे. तर केवळ 25 टक्के लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. याशिवाय बीकेसीतील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास करताना दोन तासांपेक्षा जास्त वेळ जातो.
काय सुधारणा होणार?
बीकेसीमधील प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी अनेक उपाययोजनांचा विचार सुरू आहे. प्रमुख कनेक्टर्सवर बेस्ट बसेससाठी स्वतंत्र व्यवस्था, कार्यालयीन संकुलांमधील अंतर्गत रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले करणे, सावलीयुक्त पादचारी मार्ग तयार करणे आणि मेट्रो अधिक चांगल्या प्रकारे जोडणे यांचा समावेश आहे. तसेच झाडांची संख्या वाढवणे, कोणत्याही हवामानात वापरता येतील असे पदपथ तयार करणे आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
कर्मचाऱ्यांना कसं प्रोत्साहन मिळणार?
सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष बक्षीस योजना, त्यांच्या प्रवास खर्चाचा परतावा अशा प्रोत्साहनपर उपायांवरही चर्चा सुरू आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्वतः आणि त्यांच्या टीमनेही प्रत्येक शुक्रवारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शपथ घेतल्याचेही सांगितले आहे.
