साहित्य व दप्तरांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत भाववाढ झाली. इंधन दरवाढीने कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. त्यामुळे प्लास्टिक वस्तू जसे पेन, पेन्सिल, कंपास, पाणी बॉटलसह आणि दप्तर, टिफीन बॅगचे दर वाढले. जीएसटी कमी झाल्याने वह्यांच्या किमती कमी झाल्याने पालकांना जरा दिलासा मिळाला आहे.
येत्या १५ जूनपासून शाळा सुरू असणार असल्याने रविवारी औरंगपुऱ्यासह व संपूर्ण मार्केट व शालेय साहित्य विक्री दुकानांमध्ये पाय टाकायला जागा नव्हती. सुटीचा दिवस असला तरी या गर्दीला एक महत्त्वाचे कारण म्हणजे ठरावीक दुकानांतूनच साहित्य खरेदीची सक्ती असणे हेही होते. काही खासगी शाळांकडून ठरावीक दुकानांतूनच साहित्य खरेदीची सक्ती केली जाते. पण किमती कितीही वाढल्या, तरी आपल्या मुलांना चांगले शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून आई-वडिलांची धडपड होती.
गेल्या वर्षी ४५० रुपयांपासून मिळणारी दप्तरांचे दर यंदा ७००च्या वर पोचले. पाण्याच्या बाटल्यांच्या किमती ३५०च्या पुढे आहेत. पेन्सिल बॉक्स, डबे, रंग आणि शालेय बुटांचे दरही वाढले. ‘आम्ही शक्य तितके समजावून सांगतो, पण एखादी गोष्ट मुलांना त्यांच्या आवडीनुसार हवी असते. मग मात्र आम्ही मुलांचा हट्ट सांभाळतो,’ असे पालक गौरी काळे यांनी सांगितले.
जीएसटी कमी झाल्याने वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. पेपरचे दर स्थिर आहेत. त्यामुळे वह्यांवर थेट ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. युद्ध व इंधन दरवाढीने इतर प्लास्टिक साहित्य महाग झाले आहे.
– सुनील अजमेरा, शैक्षणिक साहित्य विक्रेते
दप्तरांचा विचार केला, तर मटेरियलच्या किमती वाढल्या आहेत. दप्तरासाठी लागणारा कपड्यांचे मटेरियल, रनर असे मटेरियलचे दर वाढले. त्यामुळे दप्तराच्या किमती वाढल्या.
– शेखर पगारे, बॅग विक्रेते व उत्पादक
टिफीन बॅग, दप्तरांच्या किमतीत यंदा वाढ होणारच होती. इंधन दरवाढीचा फटका रॉ मटेरियलला बसला असून, हे साहित्य महाग झाले.
– अलका ननावरे, बॅग विक्रेत्या व उत्पादक
