साखरपुड्याला जाताना कारची एसटीला धडक, सहा जणांनी जागीच प्राण गमावले, गाडीत अडकलेल्या मुलाला गावकऱ्यांनी वाचवलं

जळगाव जिल्ह्यात अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या गुजरात राज्यातील व्यारा येथील कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

कारची बस-बाईकला धडक

मंगरूळ गावाजवळ सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावले आणि समोरून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.

साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाताना अपघात

अपघातग्रस्त कारमधील प्रवासी गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून ते एका कौटुंबिक साखरपुडा समारंभासाठी अमळनेरकडे येत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

आपत्कालीन सेवा आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

‘समृद्धी’वर अपघात; एक ठार, तीन जखमी

दुसरीकडे, समृद्धी महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवर एक कार आयशर ट्रकला मागून धडकल्याने एक तरुण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचा पुढील भाग ट्रकमध्ये अडकल्याने चालकाने कारला सुमारे दोन ते तीन किलोमीटर फरपटत नेले. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक २७३वर हा अपघात घडला. या अपघातात कारचालकाच्या बाजूला बसलेला कृष्णा राठोड (वय ३०, रा. मानोरा, जि. वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल पवार, सत्यपाल राठोड आणि कार्तिक जाधव हेदेखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *