अटल सेतू मार्गावरील पुलावरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आणि संबंधित बचाव यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून, सोमवारी सकाळपर्यंत तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) या तरुणाने रविवारी पहाटे 1.29 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 48/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
प्रतिक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून, तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित व्यवसाय करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. पुढे त्याने आपली कार अटल सेतूवर उभी केल्यानंतर समुद्रात उडी मारल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली.
हरवलेल्या प्रतिक रासकर याचे वर्णन गोरा रंग, मजबूत शरीरयष्टी, अंदाजे 5 फूट 10 इंच उंची, काळे केस, काळे डोळे, तसेच वाढलेली दाढी-मिशी असे आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. समुद्र परिसरात तसेच किनारपट्टी भागात शोधकार्य सुरू असून अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
