Goregaon-Mulund Link Roadवरील महत्त्वाकांक्षी बोगद्यांचं काम सुरू होणार, शहरातील चौथा ‘ईस्ट-वेस्ट’ कॉरिडोर; डेडलाइन समोर

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांचं बांधकाम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात फेज 3-बी अंतर्गत लिंक रोडसाठी बोगद्यांचं बांधकाम होणार आहे. यासाठी शाफ्ट तयार झालं असून, शाफ्टच्या आतमध्ये टनेल बोरिंग मशीनला जोडण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काही दिवसांपूर्वी साइटला भेट देऊन कामांची पाहणी केली.

खोदकाम कधी सुरू होणार?

या टनेल बोरिंग मशीनचे सर्व भाग एकदा जोडले की साइटची सुरक्षा चाचणी होईल. या चाचणीत मशीनचा तपास करून सर्व यंत्रणा सुरळीत काम करत आहेत याची खात्री पटली की पुढील कामाला सुरूवात होणार आहे. तेव्हाच जुळ्या बोगद्यांचं खोदकाम प्रत्यक्ष रुपात सुरू होणार आहे. हे यंत्र जोडण्याचं काम जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

यासह दुसरं टनेल बोरिंग मशीन जोडण्याचं कामसुद्धा सुरू झालं आहे. त्यानंतर येत्या काही महिन्यांत बोगद्यांचं काम सुरू होईल. हे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून जुळ्या बोगदे ऑक्टोबर 2026पर्यंत सुरू करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. संपूर्ण गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा मार्ग डिसेंबर 2028पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा मार्ग तब्बल 12.20 किलोमीटर लांब आहे. मुंबई पूर्व ते पश्चिम प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

कसा असेल लिंक रोडचा मार्ग?

लिंक रोड च्या मार्गावरील सर्वात महत्त्वाकांक्षी टप्पा म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे जुळे बोगदे. हे बोगदे 4.70 किलोमीटर लांब असतील. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन असतील. गोरेगव-मुलुंड लिंक रोडसाठी तब्बल 14,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मुंबई शहरातील चौथा ईस्ट-वेस्ट कॉरिडोर असेल. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. नागरिक जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवईसारख्या कोंडीच्या भागांना बायपास करून थेट पूर्व ते पश्चिम प्रवास करू शकतात. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवर 20 ते 25 मिनिटांवर येणार आहे.

पहिल्या दोन टप्प्यात जुन्या मार्गांचं रुंदिकरण आणि काही ठिकाणी पुलांचं बांधकाम सुरू केलं आहे. तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी खालून जाणारा हा बोगदा गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रिनगरीपासून सुरू होऊन मुलुंडमधील खिंडीपाड्यापर्यंत पोहोचेल. चौथ्या आणि अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *