कल्याण पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, रेल्वे पुलांवरील वाहतूक सुरळीत होणार; नागरिकांना मोठा फायदा

शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरलेले जागा महापालिकेने ताब्यात घेतली. त्या ठिकाणी तात्पुरती बांधलेली शेड तोडण्यात आली. तिथे असलेल्या गौतम बुद्धाच्या चार मूर्ती स्थलांतरित करण्यात आल्या. यावेळी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर कब्जा करत महापालिकेने नासधूस केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांचे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी खंडन केले आहे.

आज होणार चर्चा

महापालिकेने उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी शनिवारी कारवाई करत संबंधित जागा ताब्यात घेऊन तिचा ताबा ‘एमएमआरडीए’ला दिला. या जागेवर उभारलेली तात्पुरती पत्र्याची शेड तोडल्यावर बुद्धभूमी फाउंडेशनकडून महापालिकेवर आरोप करण्यात आले होते. या आरोपांचे खंडन करताना महापालिका आयुक्त गोयल यांनी, उड्डाणपूल महापालिकेच्या जागेतून प्रस्तावित आहे. त्यानुसार या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर केल्याचे सांगितले. तसेच या जागेलगत बुद्धभूमी फाउंडेशनची जागा असून ही जागा देखील त्यांच्या ताब्यात होती, यामुळे बुद्धविहार असलेल्या जागेला संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी व वृक्ष लागवडीसारख्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ४ जूनला त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास तयार असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यास तयार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 

सहकार्य न मिळाल्याने कारवाई

या पुलासाठी २३ खांब उभारले जाणार असून यातील १७खांबांचे काम पूर्ण झाले. उर्वरित सहा खांबांच्या बांधकामासाठी ही जागा तातडीने ताब्यात देणे गरजेचे होते. यामुळेच संबंधित फाउंडेशनबरोबर १० वेळा बैठका घेतल्या होत्या. त्यांना या कारवाईची पूर्वसूचना देत तत्पूर्वी हे बांधकाम काढून घेण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्याने अखेर ही जागा ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *