330 पुणेकर कुटुंबांचं स्वप्न पूर्ण… 15 लाख 74 हजारात मिळणार घर; महिनाभर थांबल्याचा फायदा

सब्र का फल मीठा होता है’ अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. याचा परिचय पुण्यातील 330 कुटुंबांना आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर 12 आणि सेक्टर 30-32 मधील गृहनिर्माण योजनांच्या प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राधिकरणाने प्रतीक्षा यादीतील 330 लाभार्थ्यांची निवड जाहीर केली आहे. या लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केले जणार असल्याची अधिकृत घोषणा पीएमआरडीएने केली आहे. सुरुवातीच्या सोडतीतील अनेक लाभार्थ्यांनी एकतर त्यांच्या सदनिका परत केल्यामुळे किंवा विहित मुदतीत त्या स्वीकारण्यात अयशस्वी ठरल्यामुळे प्रतिक्षा यादीमधील म्हणजेच वेटींग लिस्टमधील संधी उपलब्ध झाली आहे. या 330 कुटुंबांना वाट पाहण्याची गोड बातमी घराच्या स्वरुपात मिळाली आहे, असं म्हणता येईल.

ही घरं कशी उपलब्ध झाली?

पीएमआरडीएने 8 एप्रिल 2026 रोजी सेक्टर 12 आणि सेक्टर 30-32 मधील एकूण 1,029 सदनिकांसाठी सोडत काढली होती. सुरुवातीच्या प्रक्रियेत 871 अर्जदार यशस्वी ठरले, 3841 अर्ज अयशस्वी ठरले आणि 655 अर्जदारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. सुरुवातीला, यशस्वी ठरलेल्या 871 लाभार्थ्यांना त्यांचे वाटप केलेले सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा परत करण्यासाठी 11 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या सोडतीतील 871 विजेत्यांपैकी केवळ 401 लाभार्थ्यांनी त्यांचे सदनिका स्वीकारल्या. उर्वरित 470 लाभार्थ्यांनी तात्पुरती वाटप पत्रे जारी होण्यापूर्वीच त्यांचे वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला.

घरांसाठी आरक्षण कसं ठरलं?

 एक महिना वाट पाहिल्यानंतर या रिक्त सदनिका भरण्यासाठी, पीएमआरडीएने 8 जून 2026 रोजी प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादी सक्रिय केली. अंतिम प्रशासकीय मंजुरीनंतर, प्रतीक्षा यादीतील 655 लाभार्थ्यांपैकी 330 जणांना आता यशस्वी घोषित करण्यात आले आहे. या वाटपांमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व नवबौद्ध, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि दिव्यांग (अपंग व्यक्ती) यांसारख्या विविध प्रवर्गांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्पउत्पन्न गट (LIG) यांचा समावेश आहे. पीएमआरडीएचे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

ऑनलाइन विंडो 18 जूनपर्यंत खुली

प्रतीक्षा यादीतील 330 नवनिर्वाचित लाभार्थ्यांना त्यांचे फ्लॅट ‘स्वीकारायचे’ (Accept) की ‘परत करायचे’ (Surrender) हे निवडण्यासाठी 9 जून 2026 ते 18 जून 2026 पर्यंत एक ऑनलाइन विंडो उपलब्ध करून देण्यात आली आहे. भूमी व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी लाभार्थ्यांना दिलेल्या मुदतीत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

पेमेंटची कालमर्यादा आणि आर्थिक अटी

प्रारंभिक ठेव: फ्लॅट स्वीकारल्यानंतर, लाभार्थ्यांना 45 दिवसांच्या आत एकूण किमतीच्या 25% रक्कम भरणे आवश्यक आहे.

गृहकर्ज मंजुरी: गृहकर्ज घेऊ इच्छिणारे अर्जदार फ्लॅटच्या किमतीच्या 10% प्रारंभिक रक्कम भरल्यानंतर प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवू शकतात.

अंतिम सेटलमेंट: उर्वरित रक्कम भरण्यासाठी एकूण 60 दिवसांचा कालावधी दिला जाईल.

घरांची किंमत किती?

पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग सेक्टर 12 मधील ईडब्ल्यूएसमधील 29.55 स्वेअर मीटरचं घर 15 लाख 74 हजार 424 रुपयांना उपलब्ध आहे. याच सेक्टरमधील एलआयजी कॅटेगरीमधील 59.27 स्वेअर मीटरचं घर 35 लाख 57 हजार 200 रुपयांना उपलब्ध आहे.

सेक्टर 30-31 मधील ईडब्ल्यूएसमधील 25.52 स्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेलं घर 20 लाख 90 हजार 771 रुपयांना आहे. तर याच ठिकाणी एलआयजीमधील 34.57 स्वेअर मीटरचं घर 28 लाख 32 हजार 208 रुपयांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *