‘पोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहा,’ असा सल्ला कुख्यात गँगस्टर नीलेश गायवळ (घायवळ) याने आपल्या मोठ्या भावाला सचिन गायवळ याला दिला होता. त्यानुसार सचिन नऊ महिने पोलिसांना गुंगारा देऊन सोलापूर, जामखेड आणि अखेर राजस्थानमध्ये लपला होता. मात्र, पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने चार दिवस सापळा रचून राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावातून त्याला अटक केली.
गुन्ह्यानंतर तो फरारी
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बन्सीलाल गायवळ (वय ४८, रा. कोथरूड) याच्यावर खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलिस ठाण्यातील ४४ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यानंतर तो फरारी झाला होता.
कोठडीत भावाबाबत व्यक्त केली खंत
पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान सचिन गायवळ याने फरार भाऊ नीलेश गायवळ याच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. नीलेशच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. चौकशीदरम्यान सचिनने पोलिसांना सांगितले की, नीलेशने स्वतःच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवून त्यांचे भविष्य सुरक्षित केले. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा फटका इतर कुटुंबीयांना आणि त्यांच्या मुलांना बसत आहे. या चर्चेमुळे फरारी काळातही सचिन आणि नीलेश यांच्यात संपर्क कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नीलेश गायवळ याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
दरम्यान, कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार करून परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी नीलेश गायवळचा (घायवळ) भाऊ सचिन गायवळ याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री राजस्थानातून अटक केली. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) कारवाई झाल्यानंतर सचिन गायवळ फरारी झाला होता. मागील नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सचिन गायवळला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावातून जेरबंद केले. पुण्याच्या विशेष न्यायालयाने त्याला नऊ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
