खांदवेनगर येथील गित्ते कुटुंबात नेहमीप्रमाणे सकाळी किचनमधील कामे आवरण्याची लगबग सुरू असताना अचानक सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट होतो; त्या वेळी किचनमध्ये असणारे वृद्ध वडील विष्णू गित्ते, आई वृंदाविनी आणि मुलगा पांडुरंग आगीत गंभीर भाजले, तर पांडुरंग यांची पत्नी राजश्री बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेल्याने आणि सहा वर्षांची मुलगी निहारिकाने धाडसाने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने दोघी मायलेकी बचावल्या.
पाच जणांचे छोटेसे कुटुंब
लॉकडाउननंतर गित्ते कुटुंबीय खांदवेनगर भागात जागा घेऊन घर बांधून राहण्यास आले. विष्णू गित्ते हे खासगी कंपनीत चालक म्हणून काम करीत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. पत्नी वृंदाविनी, मुलगा पांडुरंग, सून राजश्री आणि सहा वर्षांची नात असे त्यांचे कुटुंब होते.
सून बाथरुममध्ये, नात हॉलमध्ये
किचनमध्ये नवीन सिलिंडरची जोडणी करताना गॅसगळती होऊन शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वी सून राजश्री बाथरूममध्ये अंघोळीला गेल्या होत्या, तर मुलगी निहारिका हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. गॅसगळतीनंतर स्फोट झाल्यावर राजश्री या बाथरूममध्ये असल्याने किरकोळ जखमी झाल्या. मात्र, बाथरूम आणि स्वच्छतागृहाची दारे आणि वस्तू जळून खाक झाल्या. किचनमधील आग हॉलमध्ये पसरू लागल्याने निहारिकाने आरडाओरडा केला.
पहिल्या मजल्यावरून उडी मारली
त्या वेळी शेजारच्या लोकांनी तिला उडी मारण्यास सांगितले. जीव वाचविण्यासाठी निहारिकाने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. उडी मारताना शेजारील लोकांनी तिला अलगद झेलले. त्यामुळे सहा वर्षांची मुलगी बचावली. पांडुरंग गित्ते मोठ्या प्रमाणावर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग हे एका आयटी कंपनीत कामाला होते. त्यांचे सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू होते. गित्ते यांच्या घरात स्फोट होऊन तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
…तर सर्व जण बचावले असते
‘गॅसगळती झाल्यानंतर सिलिंडर बाहेर काढण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर पडणे आवश्यक होते. त्यांनी स्वतःचा जीव सुरक्षित ठेवला असता, तर सर्व जण बचावले असते,’ असे निरीक्षण वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी व्यक्त केले. घर वाचवण्याचा घेतलेला निर्णय अखेर जीवघेणा ठरल्याचे या दुर्घटनेतून समोर आले.
