जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यान हा अपघात घडला. मलकापूर येथील आदिवासी कुटुंबातील विजय शंकर काळे (वय 19), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14) व मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय 1 वर्ष) हे दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात असताना गावाच्या पुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले.
नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात हंबरडा फोडत नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, जळगाव पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची विचारपूस करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
जळगाव बोरखेडा हत्याकांड 2020
जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांची हत्या तसेच बालिकेवर अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला दोषी ठरवत गुरुवारी (दि. ४) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भुसावळ येथे सेशन न्यायालय झाल्यानंतर बारा वर्षांत पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर न्यायालयाने मुख्य आरोपीला कलम ३०२ आणि ३७६ अंतर्गत दुहेरी फाशी सुनावली.
…अशी घडली होती घटना
ही घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी उघडकीस आली होती. बोरखेडा येथील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्य प्रदेशात गेले असताना घरात सविता (वय १३), राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्ष) आणि सुमन (वय ६ वर्ष) ही चार मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेलाने विश्वास संपादन करून पावरा यांच्या घरी थांबला होता. त्यानंतर रात्री त्याने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या कृत्याला विरोध केल्यामुळे आरोपीने इतर तीन अल्पवयीन भावंडांचाही कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करीत पळ काढला होता.
