शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात लाचखोरीचा एक अत्यंत नाट्यमय आणि पोलीस दलाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची लाच मागून, त्यातील पहिला टप्पा म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या हायव्होल्टेज कारवाईमुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
४३ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागूसिंग बहुरे आणि ४३ वर्षीय पोलीस अंमलदार गोकुळ अनिलराव खटावकर अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत.
तरुणीची विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात एका मुलीच्या वादासंदर्भात त्याच्याविरोधात तक्रार आली होती. मात्र तरुण आणि संबंधित तरुणी यांच्यात आपापसात समेट घडून हा वाद मिटला होता.
कारवाईची भीती घालत लाचेची मागणी
असे असतानाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे आणि कॉन्स्टेबल गोकुळ खटावकर यांनी “तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी देत कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या विद्यार्थ्याने थेट ‘एसीबी’चे कार्यालय गाठले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या पथकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी या लाचखोरांना पकडण्यासाठी अचूक सापळा रचला. खटावकर याने एपीआय बहुरेच्या सांगण्यावरून लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
…अन् ‘आळस’ देताच एसीबीने ठोकल्या बेड्या
लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात एक अजब ‘कोडवर्ड’ ठरला होता. खटावकर याने लाचेचे १० हजार रुपये स्वीकारताच, पोलीस ठाण्याच्या दालनाबाहेर येऊन ‘आळस’ देत हात वर करण्याचा इशारा ठरला होता.
हात वर असतानाच मनगटात बेड्या
पोलीस निरीक्षक तिगोटे यांचे पथक साध्या वेशात पोलीस ठाण्याबाहेर दबा धरून बसले होते. खटावकर याने पैसे घेताच बाहेर येत आळस देण्याचे नाटक केले, पण त्याचा हा इशारा ओळखताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने क्षणार्धात धाव घेत दोघांनाही जागीच झडप घालून ताब्यात घेतले. लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे हात वरचे वरच राहिले आणि मनगटात थेट बेड्या ठोकल्या गेल्या. पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
