बीफ पार्टी देणारे जम्मूतील आमदार रशीद यांच्यावर शाईहल्ला

जम्मू काश्मीरचे अपक्ष आमदार रशीद इंजीनिअर यांनी बीफ पार्टीचे आयोजन केल्याबद्दल त्यांच्या अंगावर नवी दिल्ली येथे सोमवारी दुपारी काळी शाई टाकण्यात आली.

दिल्ली येथील प्रेस क्लबमध्ये ट्रकमध्ये बीफ ठेवल्याच्या अफवेवरून हत्या करण्यात आलेला ट्रक ड्रायव्हर जाहीद याच्या कुटुंबीयांबरोबर रशीद यांनी पत्रकार परिषद घेतली. ते निघत असताना त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली.

हिंदू सेनेच्या विष्णू गुप्ता याने रशीद यांच्यावर शाईफेक करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या बीफ बंदीच्या निकालानंतरही अपक्ष आमदार रशीद यांनी काही दिवसांपूर्वी बीफ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीनंतर भाजपा आमदारांनी रशीद यांना विधानसभेत मारहाण केली होती. आता पुन्हा एकदा रशिद यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला आहे.

याआधी मुंबईमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *