कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून एक संतापनजक घटना घडली आहे. फक्त ओळखपत्र तयार करून देण्याच्या खोट्या आश्वासनाखाली एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे फोटो, व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीवर चार तरुणांनी तब्बल 10 महिने वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘सोशल मीडियावर व्हायरल करेन’
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे. त्याच्या मामाने फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय त्याला चालवायला दिला आहे. याच व्यवसायातून आदित्यची पीडित तरुणीशी ओळख झाली. ओळखपत्र बनवून देण्याचं आमिष दाखवून त्याने तिला मुदाळतिट्टा येथे बोलावून मुरगूड तलाव परिसरातील झाडीत नेले. तेथे त्याने तरुणीचे फोटो काढले, ते एडिट करून ‘सोशल मीडियावर व्हायरल’, करेन अशी धमकी देत पहिल्यांदा अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
10 महिने सुरू राहिला घाणेरडा प्रकार
पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर आदित्यने त्या तरुणीची ओळख आपला मित्र रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितनेही फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार केले आणि कोल्हापुरातील विविध लॉजमध्ये नेऊन वारंवार शोषण केले. नंतर रणजितने तरुणीची ओळख आपल्या दुसऱ्या मित्र प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर याच्याशी केली.
प्रणवगिरीनेही तिला कारमधून लॉजवर नेऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केले. चौथा आरोपी विक्रम रामचंद्र पाटील यानेही असाच प्रकार करत शोषण केले. विक्रमने ‘मी तुझे आधीचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो, हे प्रकरण मिटवेन’, असं खोटं आश्वासन देत पाचगावयेथील लॉजमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केले. हा घाणेरडा प्रकार गेल्या 10 एक महिन्यांपासून सुरू होता.
