ना चमचे-प्लेट, ना बिर्याणी, ना उंदीरनाशक; कशातही झिंक फॉस्फाईड नाही, डोकाडिया मृत्यू प्रकरणी पोलिसांसमोर चार नवे अँगल

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अधिकाधिक गडद होताना दिसत आहे. कलिंगडाच्या सेवनाने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय होता. आता तर डोकाडियांच्या घरातून जप्त केलेल्या सुरी, प्लेट, भात, चिकन बिर्याणी तसेच हर्बल उंदीर नाशकात विषारी झिंक फॉस्फाईडचा अंश नसल्याचे नव्या फॉरेन्सिक चाचणी अहवालात समोर आले आहे.

व्हिसेरात ‘झिंक फॉस्फाइड

पहिल्या न्यायवैद्यक अहवालात कलिंगडामध्ये तसेच त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये (व्हिसेरा) ‘झिंक फॉस्फाइड’ आढळून आले होते. त्यामुळे विषबाधेने चौघांचा मृत्यू झाल्याचे दर्शवत होते. उंदरांचा नायनाट करण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे विष कलिंगडामध्ये कसे आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसऱ्या फॉरेन्सिक चाचण्यांमुळे हे गूढ उकलण्यास मदत होईल, अशी त्यांना आशा होती.

सव्वा महिन्यापूर्वी चौघांचा मृत्यू

२६ एप्रिलच्या सकाळी ४० वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली – आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांनी आदल्या रात्री आपल्या घरी पाच इतर नातेवाईकांसोबत जेवणात चिकन बिर्याणी खाल्ली होती. तर मध्यरात्रीनंतर चौघांनीच कलिंगड खाल्ले होते.

इतर वस्तूंमध्ये झिंक फॉस्फाइड नाही

“पायधुनी येथील निवासस्थानावरुन जप्त करण्यात आलेला स्वयंपाकघरातील चाकू, स्वयंपाकाचे तीन मोठे चमचे, चार ताटं, कच्चे तांदूळ, चिकन बिर्याणी आणि उंदीर पळवून लावणाऱ्या स्प्रेची बाटली पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली होती,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या आठवड्यात पोलिसांना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये या सर्व वस्तूंमध्ये ‘झिंक फॉस्फाइड’ नसल्याचे (चाचणीचा निकाल ‘निगेटिव्ह’ आल्याचे) स्पष्ट झाले.

चार अँगलने तपास

आता पोलीस या प्रकरणाचा चार वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पुन्हा तपास करत आहेत: सामूहिक हत्या, कुटुंबीयांची हत्या करुन जीव देणे, सामूहिक आयुष्य संपवणं आणि अपघाती मृत्यू. “आर्थिक बाबींचाही तपास केला जात आहे,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अजूनही झैनबच्या शवविच्छेदन अहवालाची आणि कुटुंबातील सदस्यांच्या फोनच्या सायबर विश्लेषण अहवालांची वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *