तुकाराम मुंढेंचा धडाका! स्प्रे मारुन पिकवले जाणारे 11 लाखांचे आंबे जप्त, ठाण्यात FDAची धडक कारवाई, 37 जणांना अटक, 31 दुकांनाना टाळे

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी मोहीम राबवत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत धाडी टाकल्या. या कारवाईत कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आलेल्या आंब्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएच्या तपासात काही व्यापारी आंबे पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने इथिलिनसदृश्य स्प्रेचा थेट वापर करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी तीन मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन उघड

एफएसएसएआयच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास बंदी आहे. फळे पिकवण्यासाठी इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणीत अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. दिलासादायक बाब म्हणजे कॅल्शियम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आला नाही.

गुटखा-पानमसाल्यावरही कारवाई

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. ४ लाख ७४ हजार ४०७ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

नागरिकांना आवाहन

भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशासनाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *