जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांची हत्या तसेच बालिकेवर अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला दोषी ठरवत गुरुवारी (दि. ४) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
भुसावळ येथे सेशन न्यायालय झाल्यानंतर बारा वर्षांत पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर न्यायालयाने मुख्य आरोपीला कलम ३०२ आणि ३७६ अंतर्गत दुहेरी फाशी सुनावली.
…अशी घडली होती घटना
ही घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी उघडकीस आली होती. बोरखेडा येथील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्य प्रदेशात गेले असताना घरात सविता (वय १३), राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्ष) आणि सुमन (वय ६ वर्ष) ही चार मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेलाने विश्वास संपादन करून पावरा यांच्या घरी थांबला होता. त्यानंतर रात्री त्याने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या कृत्याला विरोध केल्यामुळे आरोपीने इतर तीन अल्पवयीन भावंडांचाही कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करीत पळ काढला होता.
‘फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एका महिन्याच्या आत हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाला कन्फर्मेशनसाठी सादर करावे लागेल. कन्फर्मेशननंतर आरोपीला अपिलाची मुभा असेल. आम्ही देखील सर्व अहवाल तेथे पाठवणार आहोत. तेथे सुनावणीनंतर फाशीच्या शिक्षेचा निर्णय लागेल’, असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
व्यसनात अडकवून तरुणीवर अत्याचार
जळगावातील एका १८ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार उघडकीस आला. या तरुणाने पीडितेला दारू पाजून कारमध्ये अत्याचार केले आणि तिचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी संशयित निर्मल दिनेश तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
