लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणावरून पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघाताचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र गळ्यावरील व्रण पाहिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराबाहेर पडला पण पुन्हा परतला नाही
किरण बंडू सोनवणे (वय 27, रा. अंजणवती, ता. जि. बीड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा भाऊ महेश बंडू सोनवणे (वय 27, रा. अंजणवती) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, किरण हा 31 मे रोजी संध्याकाळी लिंबागणेश येथे काम असल्याचे सांगून मोटारसायकलवरून घराबाहेर पडला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु त्याचा पत्ता लागला नाही.
1 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समाधान कांबळे या ग्रामस्थाने फिर्यादीला उठवून माहिती दिली की, किरणचा लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यावरील नाल्यात अपघात झाला आहे. फिर्यादीने तत्काळ नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे किरण हा मृत अवस्थेत पडला होता आणि त्याच्या अंगावर मोटारसायकल पडलेली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोटारसायकल बाजूला केली असता, किरणच्या गळ्याला पांढऱ्या रंगाचा पट्टा आणि काळसर रंगाचे व्रण दिसून आले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याचा गमछ्याने गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून अपघात झाल्याचा बनाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन
बीड येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आणि अंजणवती येथे त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश भगवत साळवे करीत आहेत.
