मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईकरांना दिलासा, 24 तासांत हवामान बदलणार; 4 जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचणार

1 जूनला दाखला होणाऱ्या मान्सूनची तारीख चुकल्यामुळे नागरिकांमध्ये टेन्शन वाढलं होतं. उष्मा असह्य झाला होता. पण हवामान विभागाने मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केल्यावर पुन्हा दिलासा मिळाला. त्यात मुंबईकरांची बुधवारची सुरुवातच मान्सूनपूर्व पावासाने झाली असून उकाड्यापासून सुटका झाली आहे.

मंगळवारी सकाळी हलक्या सरी

बुधवारी, 3 जून रोजी, सकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. बोरिवली, मिरा भाईंदर, दहिसरसह पश्चिम मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन तासांत हलका ते मध्यम पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण मुंबईत सकाळी ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यांची नोंद झाली. एप्रिल आणि मे महिन्याच्या उष्णतेनंतर आता जूनमध्ये मुंबईकर मान्सूनसाठी सज्ज झाले आहेत. सकाळी बाहेर पडणाऱ्यांना छत्री व रेनकोट घेऊनच जाण्याचं आवाहन केलं आहे.

भारतीय हवामान विभागाने दक्षिण व मध्य महाराष्ट्रात बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यांसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत धो-धो पाऊस कोसळणार आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीवर ही बुधवारी पावसासाठी अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. मुंबईत सकाळीच या पावसाचे दर्शन झाले.

ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह कोकणासह गोव्यात पाऊस होईल. परंतु, तरीही तापमानात फारशी घट होणार नसून या परिसरात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनआगमन लवकरच

दरम्यान, हवामान विभागाने मंगळावरी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 4 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, लक्षद्वीप बेटांवर, केरळ आणि तामिळनाडूमध्ये, तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. नैऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत तामिळ नाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याचीही भीती आहे. दरम्यान, चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये जून महिन्यात एल निनोमुळे सरीसरीच्या तुलनेत 90 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांचीआणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *