20 वर्षांच्या प्रयत्नांना यश! डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरभूमीचा तिढा सुटला; ट्रस्टसाठी 4 एकर जमीन मंजूर

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पिंपळेश्वर महादेव मंदिराचा अनेक वर्षांचा वाद मिटला आहे. डोंबिवलीमधील या मंदिराच्या जमिनीचा 20 वर्षांपासूनचा तिढा सुटला आहे. राज्य सरकारने मंदिरासाठी 4 एकर आणि 25 गुंठे जागा मंजूर केली आहे. यानिमित्ताने मंदिरात भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे. 8 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतील.

भव्य शिवोत्सवाचं आयोजन

सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंद साजरा केला जात आहे. या घोषणेनंतर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीसह मंदिरात पोहोचून संकल्पपूर्ती पूजन केलं. मंदिरभूमीच्या जागेचा हक्क दिल्याच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यावेळी आभार मानले. यावेळी त्यांनी 8 जून रोजी साजरा होणाऱ्या भव्य शिवोत्सवाची माहिती दिली. या उत्सवात भजन-किर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. आणि उपमुख्यमंत्र्‍यांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित असतील.

गेल्या दोन दशकांपासून या मंदरभूमीच्या हक्काचा प्रश्न कायम होता. ग्राम सभा, आंदोलनं, आणि अथक प्रयत्नांनतर अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली येथील 4.3 एकर औद्योगिक जमीन पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टला नाममात्र दरात हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्यानंतर रविंद्र चव्हाणांनी मंदिरा भेट देऊन भव्य सोहळ्याबद्दल माहिती दिली.

काय होतं प्रकरण?

डोंबिवली येथे कल्याण-शिळ मार्गावर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराला 1997मध्येच महाराष्ट्र सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता. डोंबिवली ओद्योगिक क्षेत्रातील सागाव-सोनारपाडा भागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) मालकिची असलेल्या जागेचा वापर अनेक वर्ष ट्रस्टद्वारे केला जात होता. आता ही जागा अतिक्रमणमुक्त करून ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाने केडीएमसीला योग्या ती कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी सतत यासाठी पाठपुरावा केला होता. या परिसरात गौशाळा, वैदिक शाळा, सामाजिक सभागृह आणि 400हून अधिक झाडांचा समावेश आहे. या मंदिर परिसराचा विकास, सुशोभीकरण केले जाणार आहे. यामुळे शिवभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *