महाराष्ट्रातील विचित्र प्रकार! सोनारावर विश्वास ठेवणं पडलं महागात; तिने 18 तोळे सोनं कसं गमावलं?

सोन्याचे दर हा सर्वसामान्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय आहेत. या चकाकणाऱ्या धातूचं सर्वांनाच आकर्षण आहे हे टाळता येणार नाही. विशेष म्हणजे सोन्याचे दर मागील काही काळात भरमसाठ वाढल्याने सोनं जपून ठेवण्याकडे अनेकांचा कल दिसून येतोय. पण नांदेडमध्ये अशाप्रकारे सोनं जपून ठेवण्यासाठी थेट सोनाराकडे सोनं देणाऱ्या महिलांची सोनारानेच फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका हा सारा प्रकार काय? इथल्या महिला सोनाराकडे का ठेवतात सोनं?

आदिवासी महिलांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एका सोनाराने त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नांदेडमधून समोर आलाय. फसवणूक झालेल्या एका आदिवासी महिला डॉक्टरने हा प्रकार समोर आणला असून सोनारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका असलेल्या किनवट मधील हा सारा प्रकार आहे. आदिवासी तालुका असल्याने इथली घरे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे आपल्याकडील सोने आणि इतर ऐवज अनेकदा रहिवाशी सोनाराकडे किंवा सावकाराकडे सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून ठेवतात. पण त्याचाच फायदा एका सोनाराने घेतल्याचा आरोप आहे.

सोनाराकडे 30 तोळं सोनं दिलं पण…

वाळकी येथील रहिवाशी शिल्पा वाळकीकर यांनी आपल्याकडील 30 तोळे सोने 2013 साली इस्लापूर येथील सतीश सकवान या सोनाराकडे सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून दिले होते. पण सोने परत मागितल्यावर सकवान याने टाळाटाळ केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सोनाराच्या वडिलांनी 12 तोळे सोने 2022 रोजी परत दिले पण 18 तोळे सोने देण्यास पुन्हा टाळाटाळ सुरु केली. सोने परत देण्याची मानसिकता दिसत नसल्याने अखेर शिल्पा वाळकीकर यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुरावा म्हणून त्यांनी सोनारासोबतच्या कॉल रेकॉर्डिंग, सोन्याच्या पावत्या आणि काही इतर पुरावे दिले. त्यांनतर पोलिसांनी सतीश सकवान विरोधात गुन्हा दाखल केला.

नगसेवक भावाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न

शिल्पा वळकीकर यांनी पुढे येऊन तक्रार दिल्यावर फसवणूक झालेल्या इतर दोघांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये. सकवान याचा एक भाऊ नगरसेवक तर एक भाऊ मंत्रालयात कारकून असून ते पोलीस आणि फिर्यादीवर दबाव आणत असल्याचा आरोप शिल्पा यांनी केलाय. या सोनाराने असंख्य आदिवासी महिलांची फसवणूक केली असून याची सी आय डी किंवा एस या टी गठीत करून चौकशी करावी अशी मागणीही शिल्पा यांनी केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *